सार्वजनिक रस्त्यावर राख्यांचे स्टॉल उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे

by Team Satara Today | published on : 23 August 2026


सातारा : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्त्यावर राख्यांचे स्टॉल उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेसमोरील रस्त्यावर स्टॉल लावल्याच्या प्रकरणात चंद्रकांत भगवान पवार आणि संजय जनार्दन पवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

22 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास चंद्रकांत पवार यांनी सिद्धिविनायक’ नावाचा राखी विक्रीचा स्टॉल सार्वजनिक रस्त्यावर उभारला होता. त्यामुळे वाहनांची ये-जा तसेच पादचार्‍यांना अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. स्टॉल हटविण्यास सांगूनही त्यांनी नकार दिला आणि मोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पाटोळे तपास करीत आहेत.

दरम्यान, याच ठिकाणी वैष्णवी क्रिएशन’ नावाचा राखी स्टॉल उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सातारा हॉकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय जनार्दन पवार (वय 50, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी स्टॉल हटविण्यास सांगितल्यानंतरही नकार देत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. पोलीस कॉन्स्टेबल रोहित बाजारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पोळ तपास करीत आहेत


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचवडमधील शेडवर पोलिसांचा छापा; 1.8 किलो गांजा सदृश पदार्थ जप्त

संबंधित बातम्या