शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

वेतन न झाल्याने घेतला आंदोलनाचा पवित्रा

by Team Satara Today | published on : 06 September 2024


सातारा : सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करणार्‍या ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी शुक्रवारी सातार्‍यात काम बंद आंदोलन केले. दोन महिन्याचा पगार न मिळाल्याने कामगारांनी शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून निषेध व्यक्त केला. 
सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 460 कोटीचे महत्त्वकांक्षी बजेट आहे. या प्रकल्पाचे जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. शासकीय महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीसह इतर पाच इमारती शासकीय वसतीगृह तसेच परिसर विकसनाचा मोठा प्रकल्प आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरू आहे. मात्र शुक्रवारी या प्रकल्पावर काम करणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांनी दोन महिने खात्यावर वेतन जमा झाले नाही म्हणून काम बंद आंदोलन केले. त्यामुळे आज कोणतेही काम होऊ शकले नाही.
या प्रकल्पावर सुमारे स्थानिक व परप्रांतीय मिळून दोन हजार कामगार काम करीत असल्याची माहिती मिळत आहे. या कर्मचार्‍यांच्या खात्यावर वेतन न मिळाल्याने सकाळी दहा वाजल्यापासूनच कर्मचार्‍यांनी कामे बंद ठेवून शासकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. यासंदर्भात येथील प्रकल्पाच्या व्यवस्थापकांशी संबंध साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. मात्र कर्मचार्‍यांनी प्रसारमाध्यमांकडे तक्रार करून शासकीय महाविद्यालयाच्या कामकाजाचे 80 कोटी रुपये प्रलंबित आहेत. राज्य शासन लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये बहिणींना देत आहे. मात्र येथे शासकीय महाविद्यालयाच्या कर्मचार्‍यांना मात्र दोन महिने पगार मिळत नाही. ही शोकांतिका आहे, असा निषेध व्यक्त करून कर्मचार्‍यांनी यापुढे वेतन खात्यावर जमा होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. आरोग्य संचालनालयाकडून आवश्यक अनुदान न आल्याने कामगारांचे वेतन होऊ शकलेले नाही, असे स्पष्टीकरण सूत्रांनी दिले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे गणेशोत्सवात कडेकोट बंदोबस्त 

संबंधित बातम्या