सातारा : सातारा पालिकेतील ढेपाळलेल्या प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि उपनगराध्यक्ष ॲड.दत्तात्रय बनकर यांनी पालिकेतील विविध विभागांना अचानक भेटी देत अधिकाऱ्यांची अक्षरशः शाळा घेतली. या अनपेक्षित तपासणीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.
आरोग्य, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू, स्थावर जिंदगी आणि वसुली अशा महत्त्वाच्या विभागांना सकाळीच भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जन्म-मृत्यू विभागातील कामाचा आढावा घेताना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी नागरिकांच्या त्रासाकडे लक्ष वेधले. शाहुपुरी, सदर बाजार यांसारख्या भागांतील नागरिकांना दाखल्यांसाठी पालिकेत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ‘सीएफसी’ केंद्रांशी टायअप करून स्थानिक स्तरावर ऑनलाइन दाखले देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आर्थिक वर्ष संपत आले असताना वसुली विभागाच्या नियोजनाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. विशेष म्हणजे, कार्यालयीन वेळेत गायब असणाऱ्या कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेण्यात आली असून, आस्थापना विभागाला त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.