पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता सर्वच रुग्णालयाला खडबडून जाग आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख व सर्वात मोठ्या ससून रुग्णालय आता आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये सध्या रुग्णालयाच्या आवारामध्ये असणाऱ्या सुरक्षेच्या त्रुटी सुधारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याचसाठी आता ससून रुग्णालयातील आवारामध्ये पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे.
ससून रुग्णालयाच्या आवारात ‘पोलीस चौकी’ तसेच तपासणीसाठी पिडीतांना आणल्यानंतर होणारा त्रास कमी करण्यासोबतच येथील सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. महिला आयोगाच्या बैठकीत ससून रुग्णालयाबाबत पुणे पोलिसांनी भूमिका मांडली. सोबतच येथे पोलीस चौकी सुरू करण्यासाठी तत्काळ निर्दोश दिल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात पोलीस चौकी उभाकरून कामकाज सुरु केले जाणार आहे. ससून रुग्णालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे शासकीय रुग्णालय, प्रचंड रुग्ण संख्या असणारे व दररोज सर्वात जास्त रुग्णांची वर्दळ असणारे रुग्णालय आहे.
ससून रुग्णालयामध्ये साधारणपणे दररोज हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येथे येतात. गेल्या काही काळात या परिसरात चोरी, मारहाण, इतर किरकोळ गुन्ह्यांच्या घटना वाढ झाली आहे. त्याच्या तक्रारी देखील सातत्याने होत आहेत. सोबतच या परिसरात गुन्हेगारांना अनेकवेळा उपचारासाठी किंवा तपासणीसाठी आणले जाते. तेव्हा, त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते व साथीदार येत असतात. त्याचा त्रास रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेवर पडतो. तसेच, अनेक घटना आरोपींनी रुग्णालयातून बेड्यासहित पलायन केल्याच्या घडलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमार यांनी तात्काळ पावले उचलत रुग्णालयात पोलीस चौकी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
ससून रुग्णालयामध्ये पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात २४ तास पोलीस कर्मचारी तैनात राहतील, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि तात्काळ कारवाई करणे शक्य होईल. शिवाय, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना तक्रार नोंदवण्यास रुग्णालयातून बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. त्यापुढे त्यांना पोलिसांची तात्काळ मदत मिळू शकेल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. निर्णयाचे नागरिक व रुग्णालय प्रशासनाने स्वागत केले.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहेत. ससूनमध्ये ड्रग्ज रॅकेट देखील समोर आले होते. ड्रग्ज माफिया ललित पाटील हा देखील पळून गेला होता. त्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये देखील ससूनमधून एका आरोपीने पळ काढला होता. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला होता. संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. यानंतर ससूनमधील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर आता ससूनमध्ये पोलीस चौकी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.