सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती

by Team Satara Today | published on : 19 May 2026


सातारा  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून 18 जून 2026 रोजी मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार किमान 75 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि 75 टक्के मतदार अस्तित्वात असणे आवश्यक असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. आता आवश्यक निकष पूर्ण झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार 

या निवडणुकीसाठी सोमवार, 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 असून 2 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

मतदान गुरुवार, 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी सोमवार, 22 जून 2026 रोजी केली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी सांगली हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असून निवासी उपजिल्हाधिकारी सांगली व सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. नगरपालिका व नगरपंचायत मतदार 398, जिल्हा परिषद मतदार 76 असे एकूण 479 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

सात उपविभाग मुख्यालयांवर मतदान केंद्रे निश्चित

सातारा जिल्ह्यात सातारा, वाई, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, कराड आणि पाटण अशा सात उपविभाग मुख्यालयांवर मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंदूरजणेच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यात विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला; दुचाकी मोतीबाग परिसरात कालव्याजवळ उभी, विविध तर्कांना उधाण
पुढील बातमी
निशांत पाटील हाजीर हो......भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला; अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी

संबंधित बातम्या