शिवसेनेचा भगवा फडकवत कार्यकर्त्यांना ताकद द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन; निवडणुकांत महायुतीचा वरचष्मा राहिला पाहिजे

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा :  शिवसैनिक संकटप्रसंगी धावून जातो. एकनाथ शिंदेसुद्धा संकटासाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे. आमदार खासदारकीच्या निवडणुकीत कार्यकर्ता हाच आपल्या नेत्याचा घराघरांत प्रचार करून त्याला निवडून आणत असतो. त्यामुळे त्यांच्या अडचणीच्या वेळेला कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा वरचष्मा राहिला पाहिजे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिवसेनेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अंकुश कदम, एकनाथ ओंबळे, शारदाताई जाधव, सिद्धराम म्हेत्रे, यशराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘जिथे संकट तेथे एकनाथ शिंदे पोहोचतो. मग कोल्हापूर असो, सांगली असो, पहेलगाम असो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले. हेक्टरी 47 हजार रुपये आणि मनरेगांमधून तीन लाख रुपये असे 32 हजार कोटीचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केले. विरोधक मात्र कंबरडे मोडले तरी हंबरडा मोर्चा काढून शिळ्या कढीला उत आणत आहेत. मात्र, खरा शिवसैनिक रडत नाही तर तो दुसऱ्याच्या अश्रू पुसतो. झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये सामान्य कार्यकर्त्याला ताकद द्यायची आहे. युतीमध्ये काम करताना शिवसेनेने एकजुटीने कामाला लागून प्रामाणिकपणे मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शाखाप्रमुख आणि बूथप्रमुख यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे. पश्चिम महायुतीमध्ये काम करताना शिवसेनेचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या राजकारणात दिमाखाने फडकला पाहिजे. विधानसभेला 80 जागांमधून 60 जागा जिंकून आपण इतिहास घडवला तोच इतिहास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घडवायचा आहे.’’

शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘व्यासपीठावर एकच नगरसेविका आहे, अशी खंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. पुढील निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात शिवसेना वटवृक्षाप्रमाणे भक्कम झाला असेल. एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नियोजन करू. पंचायत समिती, झेडपी निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील. शिवसेनेची ताकद वाढल्यानंतर झेडपी अध्यक्ष शिवसेनेचा असेल किंवा अध्यक्षाला शिवसेनेच्या सदस्याला विचारल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला काम करावयाचे आहे.’’ जिल्ह्यात पर्यटन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसागर बॅक वॉटर महोत्सव लवकरच घेतला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. युतीमध्ये काम करताना शिवसेनेचा आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘या सभागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने पुढील दोन महिन्यांत प्रामाणिकपणे शिवसेनेचे काम करून पक्षाची ताकद वाढवली पाहिजे आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसायला पाहिजे. संपर्कप्रमुख शरद कणसे, कराडचे राजेंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

‘कपटी विरोधकांपासून सावध राहा’

महाविकास आघाडीचे नेते अत्यंत कन्फ्युज आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. त्यामुळे कोण काय करते हे समजून येत नाही. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. राज्यात विरोधक कमी असला तरी कपटी आहे. त्यामुळे सर्वांनी सावध असावं. समोरच्याला कधीही कमजोर समजू नये, उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. निवडणुकीनंतर महामंडळाच्या कामामध्ये त्यांना संधी दिली जाईल,अशी हमी एकनाथ शिंदे यांनी दिली.

माझा नाद करु नका- शिंदे

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला याचा काही लोकांना जळफळाट झाला. मात्र, माझ्यावर इतका आकस का? तुम्ही कितीही माझ्यावर जळाला तरी माझ्यामागे जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे मला कोणाचीही भीती नाही. माझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. माझं काम म्हणजे एक घाव दोन तुकडे असतात. त्यामुळे माझा नाद करू नका, असा आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

साताऱ्यात रॅलीतून शक्तीप्रदर्शन

उपमुख्यमंत्री शिंदे येते असल्यामुळे साताऱ्यातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली. सैनिक स्कूलच्या मैदानावर एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने दुपारी सव्वाच्या दरम्यान आगमन झाले. कार्यकर्त्यांनी तेथून शिवतीर्थ पोवई नाक्यापर्यंत रॅली काढली. एकनाथ शिंदे व शंभूराज देसाई यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते हुतात्मा स्मारक परिसरात रवाना झाले. तेथे हुतात्म्यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. घोषणा देत शिवसैनिकांनी शिवतीर्थ परिसर दणाणून टाकला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता तात्काळ अदा करावा; रयत क्रांती संघटनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
पुढील बातमी
मुलीच्या जन्माचे स्वागत हीच सामाजिक समता: विस्तार अधिकारी, प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर

संबंधित बातम्या