सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूविक्रीविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया केल्या. मालगाव व परळी परिसरात केलेल्या कारवाईत एकूण 1 हजार 800 रुपयांचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला असून, एक तरुण व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालगावच्या इंदिरानगर माळ परिसरात पत्र्याच्या शेडच्या आडोशाला देशी दारूचा साठा करून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून 840 रुपये किमतीच्या मनोरंजन संत्रा’ देशी दारूच्या 90 मिलीच्या 21 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी समीर आयनाज पटेल (वय 24, रा. मालगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई परळी गावच्या हद्दीत गजवडी-परळी रस्त्यालगत करण्यात आली. येथे 960 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 180 मिलीच्या 12 बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी परळी येथील 35 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही कारवाया पोलीस कॉन्स्टेबल संदीप फणसे व प्रल्हाद ढाकरे यांनी केल्या.