सातारा : सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांचा सातबारा कर्जमुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. तसेच हमीभाव कायदा लागू करून शेतकर्यांच्या शेतीमालाला दर्जा मिळवून द्यावा. राज्य सरकारने आपला शब्द पाळावा. अन्यथा संपूर्ण कर्जमाफीसाठी रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य सदस्य अर्जुन भाऊ साळुंखे, वाहतूक संघाचे मनोहर येवले, तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, महादेव डोंगरे, कोरेगाव तालुका अध्यक्ष जीवन शिर्के, सुधाकर शितोळे, जनार्दन वारे, महेंद्र साळुंखे आदी सदस्य उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाला सादर असलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. सोयाबीन, कापूस, तूप, दूध, साखर, डाळी इत्यादी मालाच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झाला आहे. डीएपी मध्ये पुन्हा अडीचशे रुपयांची वाढ झालेली आहे. कीटकनाशके तणनाशकांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. शेतकर्याला हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागतो. पाच वर्षात शेतकर्यांचे कर्ज हे दुप्पट झाले आहे. एका बाजूला केंद्र सरकार शेतकर्यांतील कार्पोरेट कंपन्यांचे दहा लाख कोटी कर्ज निर्णय घेत नाही तर ते राईट ऑफ करते व दुसर्या बाजूला शेतकर्यांचे कर्ज दुप्पट होते, ही दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकर्यांना राज्य शासनाने योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा शेतकर्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.