सातारा : शहरातील माजगावकर माळ येथील आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात काही अज्ञात युवकांनी रविवारी रात्री दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. तसेच मोठ्याने आरडाओरडा करत परिसरात गोंधळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकाराचे चित्रण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाले असून, त्याआधारे संबंधित युवकांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही युवक वारंवार परिसरात दहशत माजवत असून अमली पदार्थांच्या सेवनानंतर रात्री उशिरापर्यंत दादागिरी आणि धिंगाणा घालत असतात.
विशेष म्हणजे, शाहूपुरी पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या युवकांवर कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचे चित्र दिसत असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, वाहनांचे नुकसान झालेल्या नागरिकांनी संबंधित युवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परिसरात वाढत्या असुरक्षिततेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.