सातारा : मसाप पुणे शाखा शाहूपुरी सातारा, मावळा फाउंडेशन सातारा आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून वर्ष झाल्याबद्दल मराठी भाषा अभिजात सप्ताहातंर्गत 'अभिजात भाषेतील कथा सौंदर्य 'हा कथा अभिवाचनाचा कार्यक्रम नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झाला. या अभिवाचनातील कथा श्रवणात मंत्रमुग्ध झाले.
यावेळी कथाकार शंकर पाटील यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांची कथा, त्याचबरोबर ज्येष्ठ कथा लेखक प्राध्यापक व.बा. बोधे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने या तीन लेखकांच्या कथांचे अभिवाचन डॉ. अदिती काळमेख ,वैदेही कुलकर्णी आणि अजय गिझरे यांनी केले. शंकर पाटील यांची 'अर्धेली 'कथा बोधे यांची 'उपाय' कथा आणि डॉ. राजेंद्र माने यांची ' दारूबंदी ' ही कथा उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेल्या. ग्रामीण बाज, ग्रामीण बोली, ग्रामीण माणसं आणि ग्रामीण घटना यांचा या कथांच्या मध्ये परिपोष होता. त्यामुळे विनोद, कारुण्य या दोन्हीचा संगम श्रोत्यांना अनुभवायला मिळाला. प्रास्ताविक करताना डॉ. राजेंद्र माने म्हणाले ' मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील यांनी एका काळी मराठी लोकांना कथा श्रवण करण्याची सवय कथाकथनामधून करून दिली आणि कथाकथनाची परंपरा चालू झाली ती आजतागायत चालू आहे .
विनोद कुलकर्णी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रवास सांगून यात मसाप पुणे आणि मसाप शाहूपुरी शाखा सातारा यांचे मोलाचे योगदान आहे. नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप कांबळे यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य अशोक भोईटे, श्रीधर साळुंखे, शिरीष चिटणीस, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ.संदीप श्रोत्री, चंद्रकांत, सचिन सावंत, शैलेश ढवळीकर, कांता भोसले, गौतम भोसले, आनंद ननावरे, युवराज खरात, नंदकुमार शेडगे, अमित शेलार, सुरेखा कुलकर्णी, शैला जाधव उपस्थित होते.