ससूनमधील रिक्त पदे लवकरच भरणार

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

by Team Satara Today | published on : 07 March 2025


मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. आता या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. ससून रुग्णालयातील पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिले.

शरद सोनावणे यांनी ससूनमधील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. तुम्ही ससूनमध्ये गेला तर नंतर जेवण करू शकणार नाहीत, एवढी अस्वच्छता तिथे असल्याचे ते म्हणाले. यावर मंत्री आणि आमदारांचा संयुक्त ससून दौरा आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर ससूनचा दौरा करण्याचे आश्वासन माधुरी मिसाळ यांनी दिले. ससून रुग्णालयात वर्षाला ५,५०० बाह्य रुग्ण येतात. रुग्णालयात १८०० खाटांची सुविधा असून, १५५ आयसीयू बेड आहेत, असेही त्यांनी सांगितले.

तसेच रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसून आपण १२ कोटी ९४ लाख रुपयांची औषधे खरेदी केली आहे. त्याचबरोबर उपकरणांची खरेदीही केली आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असल्याने काही प्रमाणात गैरसोय होत असल्याचे माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर, नर्सेसची ससूनमध्ये कमतरता

आमदार सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील गैरसोयींना वाचा फोडली. ससूनमध्ये डॉक्टर, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, औषधे उपलब्ध नसतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतेचा अभाव असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

रुग्णसंख्या वाढतेय; कर्मचारी मात्र कमी

ससून रुग्णालयाला २३०० पदे मंजूर आहेत, त्यातील ७६९ पदे रिक्त आहेत, त्यात १५६ नर्सिंगची पदे आहेत. रुग्ण वाढत आहेत आणि कर्मचारी कमी पडत आहेत. ही पदे भरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चतुर्थ श्रेणी वर्गातील ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भरली जातात. ही पदे ताबडतोब भरावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. तसेच पुढील आठ दिवसांत विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून पदे भरली जातील, अशी ग्वाही मिसाळ यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फडणवीस सरकारच्या निर्णयाने एकनाथ शिंदेंना धक्का
पुढील बातमी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज 15 मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ

संबंधित बातम्या