सातारा : घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरु असताना विकासनगर येथील घरफोडी झाल्यानंतर पोलिसांना एका संशयितावर संशय आला. त्याला पोलिसांनी येथील एमआयडीसीमधून अटक केली असून, त्याने १८ तोळे सोने चोरल्याचे उघड झाले.
जीवन शहाजी रावते (वय २७, रा. दत्तनगर, कोडोली, ता. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर डी. बी. पथकातील स्टाफ हे घरफोडीतील सराईत आरोपीची माहिती घेत असताना सराईत आरोपी जीवन रावते याच्यावर संशय आला. जीवन हा गुन्हा केल्यापासून सातारा शहरातून फरार झालेला होता. तो सातारा शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये आला असल्याबाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
डी. बी. पथकाने एमआयडीसी परिसरामध्ये सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आरोपीस अधिक विश्वासात घेवून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपी जीवनने सातारा शहर हद्दीत जुन महिन्यामध्ये डिफेन्स कॉलनी, विकासनगर, सातारा येथील एका घरातील कपाटातून दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यातील चोरीस गेलेले १८ तोळे सोन्याचे दागिने एकूण रक्कम १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल त्याने काढून दिले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजीत भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी ही कारवाई केली.