७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलजोडीला ग्रामस्थांनी दिले जीवदान; माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील घटना

by Team Satara Today | published on : 15 June 2026


दहिवडी : माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडलेल्या एका थरारक आणि भावनिक घटनेत ग्रामस्थांच्या धाडसामुळे ७० फूट खोल विहिरीत पडलेल्या बैलजोडीचे प्राण वाचले. या घटनेमुळे काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

पिंगळी बुद्रुक येथील शेतकरी राहुल विजय जगदाळे यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वी नवीन बैलजोडी खरेदी केली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जगदाळे व फडतरे वस्ती परिसरातील ‘बिघा’ शेतात कुळवटीचे काम सुरू होते. यावेळी अचानक एका बैलाचा पाय घसरला आणि क्षणार्धात औतासह दोन्ही बैल तब्बल ७० फूट खोल विहिरीत कोसळले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्याने बैलांना बाहेर काढण्यासाठीचे सुरुवातीचे प्रयत्न निष्फळ ठरत होते. बैलांचा आक्रोश आणि मालकाची असहाय्यता पाहून उपस्थित ग्रामस्थही हळहळले. अखेर दहिवडी येथील क्रेनची मदत घेण्यात आली. त्यानंतर काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बैलांच्या पोटाखाली पट्टे बांधले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेत एका बैलाला किरकोळ दुखापत झाली असून इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. बैल सुरक्षित बाहेर आल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फत्त्यापूर येथील एकाची स्प्लेंडर दुचाकीची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा
पुढील बातमी
राज्यात लवकरच मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे; १८ जूनपासून पावसाचा अंदाज

संबंधित बातम्या