रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात मोठे भूस्खलन; अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या

by Team Satara Today | published on : 10 July 2026


रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात गेल्या दोन दिवसांत ढगफुटीसदृश पडलेल्या पावसामुळे बुधवारी मोठे भूस्खलन झाले आहे. घाटातील मार्गावर अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या दरडी कोसळल्या असून, रस्त्याची एक बाजू थेट दरीच्या बाजूने झुकली आहे.

दहिवली येथे डोंगर खचून त्यात पितापुत्राचा मृत्यू झाला. चिंचवली गोटलवाडीत सुमारे दोन किलोमीटर लांब भेगा गेल्या आणि आता तालुक्यातील तिसरा मोठा प्रकार रघुवीर घाटात घडला आहे. आठवडाभरापेक्षा जास्त वेळ सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि गेल्या दोन दिवसांत ढगफुटीसारखा पडलेला पाऊस यामुळे तालुक्यात डोंगर खचण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

खेड तालुक्यातील खोपी येथून रघुवीर घाटमार्गे सातारा जिल्ह्यात जाता येते. सातारा जिल्ह्यात असलेल्या सीमेवरील गावांना खेडची बाजारपेठच सर्वात जवळ आहे. त्यामुळे या भागातील एसटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. तेथील लोकांना खेडमध्ये जा ये करण्यासाठी या घाटाचाच पर्याय आहे.

या घाटात गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने छोट्या दरडी, दगड माती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीबी आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्याने या मार्गावरील दरडी हटवण्यात आल्या आहेत. मात्र बुधवारी रात्री घाटातील एका ठिकाणचा रस्ता अचानक दरीच्या बाजूने खचला आहे. त्यामुळे येथून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा रघुवीर घाट यंदा ढगफुटीसदृश पावसामुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यटकांनी या मार्गावरून प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणात ५०.७६ टीएमसी पाणीसाठा; अर्धशतकी पाणीसाठ्याचा टप्पा पार
पुढील बातमी
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या नेटवर्कवर राज्यभर १५० छापे; भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क, मराठवाड्यातून १३ ताब्यात

संबंधित बातम्या