बारामती : शेतात, वाडी-वस्तीवर राहणाऱ्या घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, या हेतूने शेतीच्या फिडरवरून 24 तास सिंगल फेज वीजपुरवठा दिला जातो. या शेती फिडरवरील कृषी ग्राहक शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचा वापर हा अनाधिकृत आहे. तरी शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरू नये,असे महावितरणचे आवाहन आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार शेतीपंपासाठी त्या त्या भागासाठीच्या निर्धारीत वेळापत्रकानुसार दिवसा व रात्री चक्राकार पध्दतीने ८ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. कृषी ग्राहकांनी निर्धारीत वेळापत्रकानुसार उपलब्ध वीजपुरवठा शेतीपंपासाठी वापरणे अपेक्षित आहे. मात्र काही कृषी ग्राहक शेती फिडरवरील २४ तास उपलब्ध सिंगल फेज वीजपुरवठ्याचा वापर शेतीपंपासाठी करीत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. सिंगल फेज वीजपुरवठा शेतीपंपासाठी वापरला जात असल्याने सदरील रोहित्रे अतिभारीत होत आहेत. परिणामी शेतात, वाडी- वस्त्यांवर राहणाऱ्या शेती फिडरवरील घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होत आहे. शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरणे अनाधिकृत आहे. तेंव्हा कृषी ग्राहकांनी तातडीने शेतीपंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरणे बंद करावे. यापुढे शेती पंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास महावितरणकडून कठोर कारवाई करण्यात येईल, याची कृषी ग्राहकांनी नोंद घ्यावी.