देशी दारूच्या दुकानातील वादातून हमालावर हल्ला

शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 10 September 2025


सातारा, दि. १० (प्रतिनिधी) - साताऱ्यातील एका देशी दारूच्या दुकानात झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय हमालावर लाकडी दांडक्याने हल्ला करून मारहाण करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून, शाहूपुरी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय पीडित हमाल भाजी मंडई परिसरात मजुरीचे काम करतो. दि. ९ रोजी सकाळी तो आपल्या नऊ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन साताऱ्यातील एका देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यास गेला होता. त्यावेळी दुकानात बाळा नावाचा व्यक्ती उपस्थित होता.

पीडित व्यक्तीला मुलीसह दुकानात आलेले पाहून बाळा याने 'मुलीला दारूच्या दुकानात का घेऊन आला?' असा सवाल केला. त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला. वाद वाढत जाऊन बाळा याने लाकडी दांडक्याने हमालाच्या कमरेवर व उजव्या पायाच्या नडगीवर प्रहार केला. या हल्ल्यात हमालाचा पाय फ्रॅक्चर झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर काहींनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद असून पुढील तपास सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरीच्या विकासासाठी कुठेच कमी पडणार नाही
पुढील बातमी
गोळेश्वरमध्ये तलवार, कोयत्याने मारामारी

संबंधित बातम्या