सातारा : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सेवानिवृत्त माजी सैनिकाची साडेचार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकमवाडी (ता. वाई) येथील विकास किसन निकम (वय 49) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल मधुकर गुजर (रा. दौलतनगर, सातारा) याने आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 25 जुलै 2023 रोजी आरटीजीएसद्वारे पाच लाख रुपये स्वीकारले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने 50 हजार रुपये परत दिले. मात्र, उर्वरित 4 लाख 50 हजार रुपये तसेच ठरलेला परतावा न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.