विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर केंद्र सरकार गंभीर; आंदोलनाचे राजकारण करू नका : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नीट पेपरफुटीतील दोषींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटले

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांबाबत केंद्र सरकार संवेदनशील असून दोषींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटले चालविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली काही राजकीय पक्ष वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी अशा राजकीय भूमिकांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सातार्‍यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम, जिल्हा किसान विकास मंचाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, नीट पेपरफुटीतील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. कठोर कारवाईसोबतच फास्टट्रॅक न्यायालयात खटले चालविण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ती अधिक पारदर्शक व विश्‍वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरांवर उपाययोजना करत असून वरिष्ठ पातळीवर सातत्याने चर्चा सुरू आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी काही विरोधी पक्षांवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्‍नांपेक्षा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यावर काही पक्षांचा भर असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या भावना भडकावून राजकीय फायदा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत, विद्यार्थी अशा राजकारणाला बळी पडणार नाहीत, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण क्षेत्रात काळानुरूप बदल आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सूचना आणि तज्ज्ञांच्या मतांच्या आधारे परीक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. संवादाच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविण्याची केंद्र सरकारची भूमिका कायम असल्याचे सांगताना त्यांनी विविध आंदोलनांच्या संदर्भाचाही उल्लेख केला.

यावेळी सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेवर खासदार गटाने बहिष्कार टाकल्याच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सभेला 28 नगरसेवक उपस्थित होते, तर काही सदस्य वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर होते. त्यामुळे बहिष्कार झाल्याचा दावा चुकीचा असून पालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर एकसंघपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सातारा दौर्‍याबाबत बोलताना त्यांनी हा दौरा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी असल्याचे सांगितले. बूथस्तरावरील संघटन, मतदार पुनर्निरीक्षण आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सातार्‍यात युवा क्रांतीची रॅली; आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती

संबंधित बातम्या