दुष्काळसदृश परिस्थितीमुळे म्हसवडला पाच दिवसांतून एकदा केवळ एक तास पाणीपुरवठा होणार; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

by Team Satara Today | published on : 07 November 2026


म्हसवड  : माण तालुक्यात यंदा अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, धरणांमधील पाणीसाठाही अत्यल्प राहिला आहे. याचा परिणाम म्हसवड शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून, यापुढे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना पाच दिवसांतून एकदा केवळ एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन म्हसवड नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने नागरिकांना पाणी बचतीच्या सूचना केल्या आहेत. घरातील तसेच सार्वजनिक नळजोडण्यांमधील गळती त्वरित दुरुस्त करावी, पाणी भरल्यानंतर नळ बंद करावेत, गरजेपुरतेच पाणी वापरावे आणि शौचालयात अथवा मोकळ्या जागेत विनाकारण पाणी सोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने व रस्ते धुण्यासाठी, बांधकामासाठी किंवा अन्य अनावश्यक कामांसाठी करू नये. पाणीपुरवठ्याच्या वेळी नळ उघडे ठेवून पाण्याचा अपव्यय टाळावा. तसेच पाणीपुरवठ्याबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवता नगरपरिषदेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. नगरपरिषद हद्दीत कोणाकडूनही पाण्याचा विनाकारण अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड-रहिमतपूर मार्गावर पाडळी-हेळगाव येथे पोलिस प्रशिक्षणार्थींची ट्रॅव्हल्स पलटी; १५ जण जखमी, वाहतूक काही काळ विस्‍कळीत
पुढील बातमी
महिला तक्रारदाराशी लगट करणाऱ्या पुसेगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचे निलंबन; पोलिस अधीक्षकांचा दणका

संबंधित बातम्या