शानभाग विद्यालयात क्लोरीन वायूची गळती; अग्निशमन दलाच्या कारवाईने परिस्थिती नियंत्रणात, सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न

विद्यार्थ्यांची तत्काळ सुटका, तीन विद्यार्थिनी उपचारानंतर स्थिर, स्विमिंग पूलच्या देखभाल यंत्रणेत तांत्रिक बिघाड

by Team Satara Today | published on : 16 July 2026


सातारा : शहरातील केएसडी शानभाग विद्यालयात गुरुवारी सकाळी स्विमिंग पूलच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन वायूच्या सिलेंडरमधून गळती झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वायूचा तीव्र वास परिसरात पसरल्याने काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवला. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दरम्यान, प्रकृती अस्वस्थ झालेल्या तीन विद्यार्थिनींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या स्विमिंग पूलसाठी असलेल्या क्लोरीन पुरवठा यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गॅसची गळती सुरू झाली. काही मिनिटांतच परिसरात क्लोरीनचा तीव्र वास पसरला. यानंतर शाळा प्रशासनाने तत्काळ वर्ग रिकामे करून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. काही शिक्षकांनाही वायूचा परिणाम जाणवल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी संरक्षणात्मक उपकरणांचा वापर करून गळतीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली आणि कोणताही पुढील धोका नसल्याची खात्री करून परिस्थिती सामान्य करण्यात आली.

या घटनेनंतर शाळेत आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली. श्वास घेण्यास त्रास झालेल्या तीन विद्यार्थिनींना पुढील निरीक्षणासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक उपचार केले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच अनेक पालक शाळेत दाखल झाले. मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत काही पालकांनी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा शाळेच्या वाहनांची तत्काळ उपलब्धता नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही विद्यार्थिनींना रिक्षातून रुग्णालयात हलवावे लागल्याचा आरोपही पालकांनी केला.

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या घटनेबाबत स्पष्टीकरण देताना क्लोरीन गळती अल्प प्रमाणात झाली होती आणि परिस्थिती काही मिनिटांत नियंत्रणात आणण्यात आली, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे. पालकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांमध्ये धोकादायक रसायनांच्या साठवणुकीची पद्धत, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, सुरक्षा उपकरणांची उपलब्धता आणि नियमित सुरक्षा तपासणी याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून घटनेची कारणमीमांसा केली जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
“सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालंय का?” सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका
पुढील बातमी
सातारा नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांचा सेवामुदत वाढीला विरोध; सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्याची ॲड. वैभव मोरे यांची मागणी

संबंधित बातम्या