कराड : "आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पनातून सर्व वर्गाला मोठ्या आशा होत्या. मात्र यातून कोणत्याही घटकाला समाधान मिळालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे", असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यूज मिडिया शी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी महायुतीने विधानसभेला दिलेली आश्वासने आणि राज्याच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर बोट ठेवले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, महिला सर्वांचेच डोळे लागले होते.पण कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीनेलाडकी बहीण योजना सुरू केली. प्रत्येक महिलेला १५०० रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय राबविला. त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. पण पुन्हा सत्तेत आलो तर ही रक्कम २१०० रुपये वाढवून देण्याचे दिलेले आश्वासन या सरकारने पाळलेले दिसत नाही.
आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे विकासाला निधी कमी पडत आहे. फक्त मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण ज्या विभागांना मोठ्या प्रमाणात निधी वर्ग व्हायला पाहिजे त्यांना निधी मिळताना दिसत नाही.
महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे. पण प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न जर काढले तर आपले राज्य आज कोठे आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामध्ये इतर राज्ये पुढे गेली आहेत ही बाब ध्यानात घेण्याची गरज आहे असेही चव्हाण म्हणाले.