सातारा : अल्पवयीन मुलीचा मोटारसायकलवरून पाठलाग करून, तिला अडवून प्रेमाचा आग्रह धरत वारंवार मोबाईलवरून त्रास दिल्याप्रकरणी आरोपीला सातारा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, आरोपी फरार असतानाही नव्या कायदेशीर तरतुदींचा वापर करून खटला चालवून पूर्ण करण्यात आला.
सातारा विशेष न्यायालयातील अशा स्वरूपाची ही पहिलीच कारवाई असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
24 जुलै 2016 रोजी ते 27 जुलैपर्यंत हा प्रकार घडला होता. पीडित 17 वर्षीय मुलीचा आरोपी अमर गोविंद शेजवळ (वय 21, रा. सुळेवाडी, ता. पाटण) याने मोटारसायकलवरून पाठलाग केला. तसेच विविध ठिकाणी तिला अडवून ‘तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे सांगत त्रास दिला. तसेच मोबाईलवरून वारंवार फोन करून तिचा पाठलाग व छळ केला. आरोपी सुनिल आत्माराम शेजवळ (वय 21) याने या प्रकारात अमरला मदत केल्याचा आरोप होता.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. कानुगडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी सातारा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) श्रीमती एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात झाली. सरकारतर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती तळवलकर यांनी बाजू मांडत साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
न्यायालयाने आरोपी अमर गोविंद शेजवळ याला दोषी ठरवत सहा महिने सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी 15 दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणात आरोपी फरार असतानाही सुधारित कायद्यातील नव्या तरतुदीनुसार खटल्याचे कामकाज पुढे नेऊन दोषसिद्धीपर्यंत नेण्यात आले. फरार आरोपीच्या गैरहजेरीत अशा प्रकारे खटला पूर्णत्वास नेण्याची सातारा विशेष न्यायालयातील ही पहिलीच घटना असल्याने पोलिसांच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत या निकालाची विशेष नोंद झाली आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कोरेगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी आणि रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल विनोद मोरे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.