पाटण तालुक्यातील अबदारवाडीत ‘ईव्हीएम’वरच मतदान करण्याचा ठराव

कराड : कराड तालुक्यातील कोळेवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्या, अशा आशयाचा ठराव काही दिवसांपूर्वी घेतला होता. तोच गुरुवारी पाटण तालुक्यातील अबदारवाडीत वृक्ष संवर्धन व पर्यावरण बचावासाठी ‘ईव्हीएम’वरच मतदान घ्यावे, असा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील कोळेवाडी अन् पाटण तालुक्यातील अबदारवाडी आता चांगलीच चर्चेत आली आहे.

वृक्ष संवर्धन व पर्यावरणासाठी काम करणारी असा नावलौकिक असणाऱ्या पाटण तालुक्यातील अबदारवाडी ग्रामपंचायतीने ‘ईव्हीएम’वरच मतदान व्हावे, असा ग्रामसभेचा गुरुवारी बहुमताने ठराव घेतला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास कागदासाठी वृक्षतोड होईल. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, हा ऱ्हास रोखण्यासाठी ‘ईव्हीएम’वर मतदान व्हावे. तसेच ‘ईव्हीएम’वर मतदान करण्यास अशिक्षित लोकांनाही सहज असून मतदान बाद होत नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम’चे समर्थन ग्रामसभेत ग्रामस्थांनी केले आहे.

पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्या अबदारवाडी ग्रामपंचायतीत आम्ही असा ठराव केला आहे. यापुढे शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’च्या समर्थनार्थ पाटण तालुक्यातील २५० वर ग्रामपंचायतींमधून असा ठराव घेणार आहे. - विजय शिंदे, सरपंच, अबदारवाडी, अध्यक्ष, शिवशाही सरपंच संघ

 ईव्हीएम समर्थनार्थ अबदारवाडीत ग्रामसभेने बहुमताने ठराव केला आहे. तो रीतसर शासनाकडे सादर करणार आहे. - सुजाता पवार, ग्रामसेविका अबदारवाडी

मागील बातमी
डीआरआयकडून ९.६ कोटी रूपयांचे १२ किलो सोने जप्त
पुढील बातमी
'एक देश,एक निवडणूक'चा निर्णय ऐतिहासिक ठरणार!

संबंधित बातम्या