चिमुकल्याचे प्रसंगावधान! आंबेनळी घाटात कार १०० फूट खोल दरीत

१० वर्षीय मुलाच्या 'त्या' एका कॉलमुळे वाचले प्राण; रेस्क्यू टीमची थरारक कामगिरी

by Team Satara Today | published on : 25 December 2025


महाबळेश्वर : सह्याद्रीच्या रांगा आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात गुरुवारी (दि. २५) सकाळी एक थरारक घटना घडली. पर्यटकांची कार चालकाचा ताबा सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या घटनेत १० वर्षीय मुलाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे तातडीने मदत मिळणे शक्य झाले आणि मोठा अनर्थ टळला.

​सकाळच्या सुमारास आंबेनळी घाटातील वळणदार रस्त्यावर आणि तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत झेपावली. गाडीत एकूण पाच प्रवासी होते. अपघात होताच गाडीतील १० वर्षीय मुलाने घाबरून न जाता तत्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला.

​फोनवर लहान मुलाचा आवाज असल्याने पोलिसांना सुरुवातीला हा अपघात बसचा झाला की कारचा, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, घाटात नेमका अपघात कुठे झाला हे समजत नसल्याने मदतकार्यास काहीसा विलंब झाला. मात्र, महाबळेश्वर पोलीस आणि रेस्क्यू टीमने हार न मानता शोधमोहीम राबवून अचूक ठिकाण गाठले.

​घटनेचे गांभीर्य ओळखताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स तातडीने मदतीला धावले. खोल दरी, घनदाट जंगल आणि निसरडी वाट अशा कठीण परिस्थितीतही जवानांनी दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरून बचावकार्य सुरू केले.

​या मोहिमेत अजित जाधव, आशिष बिरामणे, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव, साई हवलदार, विक्रांत जाधव, सुनील बाबा भाटिया, सुजित कोळी, अमित कोळी, अनिल केळगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवाची बाजी लावून जखमींना बाहेर काढले. जखमींना तत्काळ महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

​घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

आंबेनळी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, त्या १० वर्षीय मुलाने दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याने वेळीच कॉल केल्यामुळेच तातडीने मदत मिळणे शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारा वाघीण थेट रस्त्यावर;दिवसाढवळ्या लोकांना दिले दर्शन
पुढील बातमी
सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या