नागपूर : जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत दिले. नागपूर जिल्ह्यात नियमबाह्य वाळू वाहतूक आणि वाळू चोरीच्या घटना लक्षात आल्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाला तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूरसह भंडारा आणि राज्यातील विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचेही त्यांनी कौतुक केले. राज्यात चुकीच्या पद्धतीने वाळूचे उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. महाराष्ट्रभर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे. मात्र, वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. पाच-सहा ब्रासची रॉयल्टी भरून वीस ब्रास वाळूची वाहतूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणतेही मतभेद असल्याचे त्यांना वाटत नाही. “पार्थ पवार यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली, याची माहिती माझ्याकडे नाही,” असे त्यांनी सांगितले.
राज्यात मंत्री फेरबदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि यांच्या स्तरावर होणारा विषय आहे. “या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.