रयतचा वटवृक्ष ए.आय.च्या युगातही बहरतोय : आंतरराष्ट्रीय ए.आय. तज्ञ डॉ.भूषण केळकर

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा उत्साहात संपन्न

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता हे चातुर्य असून त्याचा वापर करा पण त्यावर अवलंबून राहू नका. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होईल परंतू शिक्षकांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकणार नाही. पण शिक्षणाला नवी दिशा देईल. तंत्रज्ञान हे शिक्षकांसाठी सहाय्यभूत असून तो पर्याय नाही. तंत्रज्ञान हे विद्यार्थ्यांवर मानवी भाव भावनांचे संस्कार करू शकणार नाही.
आज जगभरात ए.आय. ची ३ लाख ६२ हजार टूल्स वापरली जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे या क्षेत्रात कार्य सुरु असून यातून पथदर्शी अनेक टूल्स तयार होतील. कर्मवीर आण्णांनी उभारलेली रयत ही लोकसहभातून चालविली जाणारी एक प्रकारची संसद असून कर्मवीरांचा वटवृक्ष आजच्या ए.आय.च्या युगातही बहरतोय. रयत माऊलींनी संस्थेच्या उभारणीत केलेला निस्सीम त्याग आणि कर्मवीरांच्या कार्याचे मूल्यमापन कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण करू शकणार नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ए.आय. तज्ञ डॉ.भूषण केळकर यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा, सातारा येथे संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यास प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ए.आय. तज्ञ             डॉ.भूषण केळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.एम.बी. शेख, व्हा.चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारी खा.सुप्रियाताई सुळे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव  प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे,  माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव बी.एन. पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भूषण केळकर यांनी जगभरातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीची माहिती देताना मानवी जीवनावर होणारे परिणाम विशद केले. शिक्षण क्षेत्रात त्याचा वापर कसा असावा याचा ऊहापोह करताना उपयुक्त मार्गदशन केले.  
चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेचा प्रगतीबाबत बोलताना, रयत शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा, रयतच्या सर्व शाखेत इंटरऍक्टीव्ह पॅनल, कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण, ईआरपी स्वॉफ्टवेअर, माजी विद्यार्थी संघटना, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, संशोधन आणि विकास विषयक नवीन धोरणाबद्दल माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतून वर्ग १ पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. 
कर्मवीर जयंती निमित्त सातारा शहरा त रयत सेवक, विद्यार्थी, संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी एकत्र येऊन कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरी काढली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, लहूजी वस्ताद, आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
प्रास्ताविक संस्थेचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांनी केले. पुरस्कार वितरणाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी तर आभार संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास कर्मवीर कुटुंबिय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य शहाजी डोंगरे, प्रदीप हिवरकर, डॉ.धनंजय नलवडे, जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद, आजीव सेवक विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक,विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना मिळणार स्वच्छ, सुसज्ज सुविधा
पुढील बातमी
गणेशोत्सवात प्रेफरकडून ‘मूषक लोन’ अभियान सुरू; कॅशबॅकसह आर्थिक साक्षरतेवर भर

संबंधित बातम्या