पुणे-सातारा रस्त्यावर ‘द बर्निंग बस’चा थरार

by Team Satara Today | published on : 18 April 2025


खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर वेळू (ता. भोर) गावच्या हद्दीमध्ये एका खासगी बसला गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागली. वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवून बस रस्त्याच्या कडेला उभी करून तत्काळ प्रवाशांना बाहेर काढले, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी कंपनीची व्होल्व्हो बस कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेने जात होती. अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम डब्ल्यूओएम कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होते. त्याचबरोबर आगीमध्ये जळत असलेल्या बसमध्ये स्फोट होत असल्याने आग आटोक्यात येण्यास उशीर झाला, तोपर्यंत बस जळून खाक झाली होती.

या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या साहित्यासह बसमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
"महाआतंक" या कवितासंग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न !
पुढील बातमी
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

संबंधित बातम्या