सातारा : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, तसेच चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांचे बारामती येथे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण राज्यासह कोरेगाव शहरावर शोककळा पसरली असून, लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १०० टक्के बंद पाळला.
अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. शाळा, महाविद्यालये, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, बालवाडी तसेच सर्व व्यापारी आस्थापना बंद राहिल्या. सायंकाळपर्यंतही शहरात कडेकोट बंदचे वातावरण कायम होते. शहराच्या प्रत्येक विभागात अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजलीचे फलक उभारण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनीही स्वतंत्रपणे श्रद्धांजली फलक उभारून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. हा शहर बंदचा निर्णय बुधवारी सायंकाळी जुना मोटर स्टॅण्ड येथे सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. यावेळी कोरेगाव शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन करण्यात आले होते.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे केवळ राज्यालाच नव्हे तर कोरेगाव शहर आणि तालुक्याला मोठा धक्का बसला असून, मोठी हानी झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची व नेतृत्वाची आठवण म्हणून शहराने एकसंधपणे हा बंद पाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस कोरेगाव शहर एकजुटीने श्रद्धांजली अर्पण करत असल्याचे भावनिक दृश्य या बंदच्या निमित्ताने दिसून आले.