सातारा : सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच रिक्षा चालक मनमानी करत असून प्रवाशांकडे अव्वाच्या सव्वापैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असून या संदर्भात संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावा अशी मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.
सातारा येथून विविध कामानिमित्त कराड, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी जाण्या- येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कामानिमित्त उशीर झाल्यामुळे रात्री उशिरा सातारा बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये महिला, लहान मुले यांचाही समावेश असतो.
शाहूनगर, जगतापवाडी, राजवाडा, शाहूपुरी, करंजे, संगमनगर, वाढे फाटा, मोळाचा ओढा या ठिकाणी रात्री उशिरा जाणाऱ्या प्रवाशांकडे रिक्षा चालक मनमानी करत भाडे आकारत असतात. रात्रीचे वेळ, कुटुंबातील महिला व लहान मुले समवेत असल्यामुळे अनेक प्रवाशांना रिक्षा चालकांच्या मनमानीपणाला बळी पडल्याशिवाय पर्याय राहत नाही. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच रिक्षा थांबा असून त्या ठिकाणी होणाऱ्या गैरवाहतुकीला आळा घालण्यासाठी सातारा बसस्थानक प्रशासनाने सुरक्षा रक्षकही नेमल्या असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. संबंधित रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने देऊन त्याठिकाणी होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.