बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. पण आता या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमासंबंधी मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या, महाशिवरात्रीचा दिवस अतिशय पवित्र दिवस आहे. त्यामुळे मंदिर परिसरात केवळ धार्मिक कार्यक्रमच झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील, तरी त्यावर फेरविचार झाला पाहिजे. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवले पाहिजे. पण सेलिब्रिटिंना आणून येथे एक वेगळाच पायंडा पाडण्याचा प्रयत्न त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केला आहे. हे चुकीचे घडत आहे.
विशेष म्हणजे फुलवंती चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्राजक्ता माळीने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. या चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर तिने बारा ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद घेऊन तिच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात केली होती. त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर प्राजक्त माळीची भूमिका काय हे अद्याप समोर आले नाही.
महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त 25 फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात येईल. मंगळवारी सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत बासरी प्रशिक्षण वर्गाचा बासरी वादन कार्यक्रम होईल. परंपरेनुसार बुधवारी दुपारी 3 वाजता श्रीत्र्यंबक राजाची पालखी मंदिरातून निघेल. सकाळी देवस्थानमध्ये लघुरुद्र तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. नियोजित मार्गावरून पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येईल. या दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये करण्यात येणार आहे. सायंकाळी 8 वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणमस्तु नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत.