सातारा : "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध धम्म हा मध्यम मार्ग असून त्यात अंधश्रद्धेला आणि अतिरेकाला स्थान नाही. मात्र, आजचा समाज पुन्हा एकदा जुन्या रूढींच्या मागे लागला असून तरुण पिढी मोबाईलच्या मोहात अडकून दिशाहीन होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि येणारी पिढी वाचवण्यासाठी मुलांच्या मनात लहानपणापासूनच बुद्धांचे सदाचार आणि नैतिकता रुजवणे ही काळाची गरज आहे," असे परखड प्रतिपादन जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघमारे यांनी केले.
त्या येथील सातारा गोडोली येथील जेतवन बुद्धविहारात पंचशील प्रसारक मंडळ व माता रमाई महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बुद्ध पोर्णिमा कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.अध्यक्षस्थानी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे होते. माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष आयु.स्वाती मस्के उपाध्यक्ष आयु.सुनिता मस्के, जेष्ठ मार्गदर्शक आयु.संभाजी मस्के पंचशील प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आयु.निखलेश मस्के, उपाध्यक्ष आयु.सिध्देश मस्के.खजिनदार आयु.सिध्दांत मस्के.ऋतिक मस्के, रितेश मस्के,शुभम मस्के, सागर मस्के, शौर्य मस्के इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे आपल्या भाषणात सौ. वाघमारे यांनी समाजातील वाढत्या अंधश्रद्धेवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "बुद्ध हे जगातील पहिले वैज्ञानिक होते, ज्यांनी मानवी मनातील अंधश्रद्धेची जळमटे काढून टाकण्याचे काम केले. आजही संकटकाळी किंवा आजारपणात लोक विज्ञानाऐवजी बुवाबाजीकडे वळतात, हे भटकणे आहे. . आपण जर खऱ्या अर्थाने बुद्ध स्वीकारला असेल, तर त्यांचा विवेकवादी दृष्टिकोनही स्वीकारला पाहिजे. केवळ 'जयभीम'चा नारा देऊन बदल होणार नाही, तर भीमाचे विचार आचरणात आणणे हाच खरा सन्मान ठरेल"आजची मुले तासनतास मोबाईलच्या काल्पनिक विश्वात वावरत आहेत. मोबाईल रिचार्जसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पालकांवर हात उचलण्यापर्यंत मुलांची मजल गेली आहे. ही मोबाईलची गुलामगिरी समाजाला विनाशाकडे नेत आहे. पालकांनी, विशेषतः मातांनी आपल्या मुलांच्या संगतीवर आणि त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.सुभाष वाघमारे म्हणाले की, बुद्ध धम्म जातीपातीचा धम्म नसून तो माणूस असलेल्या सर्व माणसाना उपकारक आहे. यावेळी त्यांनी 'अत्त दीप भव' (स्वतःचे दिवे स्वतः व्हा) या महामंत्राचा अर्थ स्पष्ट केला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला 'अत्त दीप भव' हे बोधवाक्य सुचवले असून ते अधिकृतरीत्या स्वीकारले गेल्याची माहिती देत रयत शिक्षण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांचे कार्य हे बुद्धांच्या प्रमाणेच सर्वकल्याणकारी असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात व्यावसायिक कौशल्याचे बरोबर शहाणपण येणारे शिक्षण आपण घेतले पाहिजे असेही ते म्हणाले . दारूमुळे घराची बरबादी होते, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहून घराचा उद्धार करा उच्च शिक्षणावर भर द्या. प्रत्येक घरात पुस्तकांचे कपाट असले पाहिजे; अन्नाबरोबर ज्ञानावर खर्च करणे प्रगतीसाठी आवश्यक आहे बुद्ध धम्म हा 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' असा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग आहे.
प्रारंभी प्रास्ताविक आयु.जालिंदर मस्के यांनी केले. रमेश मस्के यांनी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्याविषयीच्या कृतज्ञता लेखाचे वाचन केले. सूत्रसंचालन आयु.सुरेखा मस्के यांनी केले. आभार आयु. अरूणा मस्के यांनी मानले बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनी एकत्रित सहभोजन केले.