सौ सोनार की.. एक लोहार की...! फसवणूक केल्याने मलकापुरातील लाभार्थ्यांनी दुकानच लुटले

by Team Satara Today | published on : 14 November 2025


सातारा :  २५ ते ५० टक्के डिस्काउंटमध्ये आगाऊ बुकिंग करून भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचे आमिष दाखवून शेकडो लोकांकडून आगाऊ पैसे भरून घेणाऱ्या परप्रांतीयांना लाभार्थी नागरिकांनी आज चांगलाच धडा शिकवला. आपली फसवणूक झाल्याचे समजून आज सकाळी संबंधित दुकानाचे कुलूप तोडून लाभार्थी नागरिकांनी हाताला सापडेल ती वस्तू लंपास केल्याची घटना मलकापूर, ता. कराड येथे घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आगाशीवनगर, मलकापूर ता. कराड येथील वृंदावन कॉलनीमध्ये गेल्या महिन्यात परप्रांतीय व्यक्तींनी सोना ट्रेडर्स नावाचे भांडी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान सुरू केले होते. या दुकानात अॅडव्हान्स बुकिंग करून काही मुदतीनंतर वस्तू नेणाऱ्यास पंचवीस टक्के तर काही मुदतीनंतर नेणाऱ्या पन्नास डिस्काउंट देणार अशी पावती गुंतवणूकदाराला देण्यात येत होती. पहिले पंधरा दिवस काही लोकांना वस्तूही मिळाल्या. त्यामुळे वस्तू बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. संबंधित गुंतवणूकदारांनी वस्तूचे बुकिंग करून संपूर्ण रक्कम जमा केली. 

संबंधित परप्रांतीय लोक पैसे घेऊन पसार झाले असावेत असा गुतंवणूकदारांचा समज झाला. अन् दुकानाचे शटर तोडून वस्तूंची पळवा-पळवी केली. कोणाला काय सापडेल ते घेऊन जात होता. यावेळी काही गुंतवणूकदारांच्यात बाचाबाची ही झाली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी थेट कराड शहर पोलीस ठाणे गाठले. तक्रार घेण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पोलीस ॲक्शन मोडवर ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासगी वाहनांची तपासणी
पुढील बातमी
साताराच्या नगराध्यक्षपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर?

संबंधित बातम्या