सातारा : राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या आगामी निवडणूक रणनीतीसंदर्भात महत्त्वपूर्ण हालचाली सुरू आहेत. याच अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवार निश्चिती व निवडणूक तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी राज्य निवड मंडळाची बैठक मुंबई येथील टिळक भवन, दादर येथे आयोजित करण्यात आली असता सदर बैठकीस सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब) उपस्थित राहिले.
प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी योग्य, सक्षम व पक्षनिष्ठ उमेदवार निश्चित करण्यासह इतर बाबींवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक मजबुती, प्रचार रणनीती, कार्यकर्त्यांची भूमिका व निवडणुकीतील विविध महत्त्वाच्या विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
बैठकीस आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित होते. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष अधिक जोमाने उतरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवत प्रभावी लढा देईल, असा निर्धार यावेळी व्यक्त केला.