कराड : कराड-पाटण मार्गावर दोन दुचाकींच्या धडकेत डॉक्टर ठार, तर युवक गंभीर जखमी झाला. मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
डॉ. निवास दत्तू वीर (वय ६३, मूळ रा. तुळसण, ता. कराड, सध्या रा. विमानतळ-वारुंजी, ता. कराड) असे मृत डॉक्टराचे नाव आहे. मुजम्मिल फरीन सय्यद (वय २५, रा. केसे-पाडळी, ता. कराड) हे जखमी झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, तुळसण येथील डॉ. निवास वीर हे कुटुंबीयांसह विमानतळ येथे वास्तव्यास होते. त्या ठिकाणीच त्यांचे क्लिनिक असून, आज सकाळी ते दुचाकीवरून मुंढे गावात गेले होते. तेथून ते घराकडे परतताना कराड-पाटण महामार्ग ओलांडत होते. त्या वेळी पाटणहून आलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात डॉ. वीर व दुसऱ्या दुचाकीवरील सय्यद हे गंभीर जखमी झाले.