सातारा : सातारा शहरातील शाहू चौक परिसरात उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाचे लोकार्पण आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
सातारा नगरपालिकेच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या परिसराची पाहणी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली. यावेळी संयोजन समितीचे सदस्य, नगरपालिकेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहतूक आणि नागरिकांच्या सोयींसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव म्हणून उभारण्यात आलेला हा पुतळा शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा ठरणार असल्याचे मत नगराध्यक्ष मोहिते यांनी व्यक्त केले. सुरुवातीला महाराष्ट्र दिनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता; मात्र नियोजनात्मक कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.
या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.