जिल्हा बँकेच्या ठरावाच्या कारणातून जावळीत वाद मात्र नेते पुण्यात एकत्र; एकत्र दिसल्याने राजकीय भुवया उंचावल्या

by Team Satara Today | published on : 27 August 2026


मेढा  : सातारा जिल्हा बँकेच्या ठरावाच्या कारणातून जावळी तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. जोरदार वादही झाला. पण, पुण्यातील एका कार्यक्रमातील मंचावर राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दिसून आले. यामुळे राजकीय चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पुढील काही महिन्यांत होत आहे. त्यापूर्वीच विविध संस्थांचे ठराव घेण्याची प्रक्रिया सर्वच तालुक्यांत पार पडली. यामध्ये जावळी तालुक्यातील राजकारण अधिक वादाचे ठरले. नेतेमंडळींनीही यामध्ये सहभाग घेतला होता. तर कार्यकर्तेही समोरासमोर आल्याचे दिसून आले. यामुळे जावळीतील राजकारण तापले. यामध्येच वरिष्ठ नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. अशातच पुण्यातील कार्यक्रमात शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र दिसल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पुणे येथील पिंपरीमध्ये सातारा-सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे एक मंडळ आहे. या मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात. या कार्यक्रमासाठी शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. विशेषकरून दोघेही शेजारी-शेजारी दिसून आले. यामुळे राजकारणात सर्व काही चालते अशीच चर्चा सुरू झालेली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटक नेपाळमध्ये सुरक्षित; शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि मैत्रिणींचा समावेश
पुढील बातमी
रक्ताचे पाट वाहतील, पण इंचही जमीन देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात रणकंदन

संबंधित बातम्या