सातारा : सुरुर-वाई-महाड रस्ता रुंदीकरण करताना बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. शेंद्रे ते कागल महामार्गाचे कामही निकृष्ठ पध्दतीने सुरु आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाव्दारे विविध मागण्या केल्या होत्या. त्याची दखल घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करण्याची ग्वाही दिली.
तसेच महामार्ग ठेकेदाराला सूचना करत निकृष्ठ कामाकडे लक्ष देण्याचे, महामार्ग रुंदीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांबाबत असणार्या त्रुटींबाबत, नियमबाह्य सुरु असलेल्या कामांबाबत सुशांत मोरे यांनी ना. शिवेंद्रराजेंना निवेदन दिले. शेंद्रे ते कागल येथील राष्ट्रीय महामार्गाचे सुरु असलेले काम हे दर्जाहिन आहे. या कामाची निविदा ज्या ठेकेदाराला देण्यात आली आहे त्याने प्रत्येक किलोमीटर वाईज सब ठेकेदार नेमले आहेत.
हे काम करताना अनेक वृक्ष तोडण्यात आले असून संबंधीत विभागांची परवानगी घेतलेली नाही. काम पुर्ण झाले त्या ठिकाणी नियमाप्रमाणे नवीन वृक्ष लागवड केली नाही. त्यामुळे वर्क ऑर्डर मधील अटी व शर्तीचा भंग झाला आहे. ठेकेदाराने निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले असून या रस्त्याच्या कामाची निविदा रद्द करावी. फेर निविदा काढावी. संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे.
त्याचबरोबर वाई-सुरुर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असून यातही वृक्ष तोडले जात आहेत. वृक्षतोड करण्यापूर्वी ठेकेदारांनी नवीन झाडे जगवण्याची जबाबदारी घ्यावी. झाडे जगवण्याचे काम ठेकेदाराने न केल्यास संबंधित ठेकेदाराला दंड ठोकून संबंधीत ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली होती. यावर शिवेंद्रराजे यांनी तत्काळ दखल घेत सुरुर-वाई-महाड रस्त्याचे रुंदीकरण वृक्षतोड न करता करण्याची ग्वाही दिली.
शेंद्रे-कागल महामार्ग ठेकेदाराला कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. ना. शिवेंद्रराजे यांनीही तातडीने हा प्रश्न मार्गी लावल्याने आता पर्यावरणाचे नुकसान टळणार आहे. तसेच महामार्गाच्या कामाला गती येऊन त्याचा दर्जा सुधारण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सुशांत मोरे यांनी दिली.