सातारा : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चांचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे.
अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अजित पवार गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असून, पक्षाची पुढील दिशा, निर्णयप्रक्रिया आणि रणनिती याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पक्षाची ताकद एकत्र आणण्याची गरज असल्याचे मत अनेक नेते व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि संघटनेची भूमिका लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील. मात्र, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकांमध्ये विविध तर्कवितर्क मांडले जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात या चर्चांना नेमके कोणते वळण मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.