महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीमध्ये 30 हून जास्त भाविक जखमी

प्रयागराज : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत दहापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर त्रिवेणी संगमावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र तिथे चेंगराचेंगरी झाली नाही तर गर्दी जास्त असल्याने काही भाविक जखमी झाल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.

मौनी अमावस्येच्या निमित्ताने २८ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता पवित्र स्थानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजमध्ये आले होते. सर्व भाविक त्रिवेणी संगमाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होते. त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी एकाच वेळी गर्दी झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेनेही शाही स्नान रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्यानंतर संतांनी दुपारी शाही स्नान करण्याची घोषणा केली. गर्दीमुळे संगम काठावरील चेंजिंग रूमचे गेट अंगावर पडल्याने चेंगराचेंगरी झाली अशी माहिती सुरुवातीला पोलिसांनी दिली. त्यानतंर आता तिथे चेंगराचेंगरी झाली नसल्याचे  वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी म्हटलं.

"तिथं चेंगराचेंगरी झाली नाही, गर्दी जास्त असल्याने काही भाविक जखमी झाले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर लक्ष देऊ नये. अमृत स्नान लवकरच सुरू होईल. अमृत स्नानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्व घाटांवर तयारी केली गेली आहे आणि लोक त्या घाटांवर सहज स्नान करू शकतात. माझ्याकडे मृतांची किंवा जखमींची संख्या नाही. जिल्हा पोलिसांकडून याबाबत माहिती मिळू शकेल. सध्या मी इथली व्यवस्था पाहत आहे. आम्हाला लोकांची व्यवस्था पाहायची आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी दिली.

या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून महाकुंभाच्या व्यवस्थेवर सतत लक्ष ठेवून आहेत.

"महाकुंभात झालेल्या दुर्घटनेत काही पुण्यवानांना गमवावे लागले. अनेकांना दुखापतही झाली आहे. मी पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. मी उत्तर प्रदेश सरकारच्या सतत संपर्कात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मागील बातमी
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
पुढील बातमी
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक

संबंधित बातम्या