गुटख्याची तस्करी करताना राजकीय पदाधिकारी ताब्यात

फलटण शहर पोलिसांची कारवाई; 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 16 November 2024


फलटण : फलटण शहरात अवैधरित्या गुटख्याची तस्करी करताना एका राजकीय पदाधिकार्‍याला फलटण शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 नोव्हेंबर रोजी फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल समोर मोटर सायकल क्र. एमएच 11 सीसी 4147 वरुन गुटखा व गुटख्यासाठी लागणार्‍या साहित्याची तस्करी करीत असतानाच फलटण शहर पोलिसांनी रविंद्र किसन राऊत वय 51, रा. फरांदवाडी, ता. फलटण, जि. सातारा यांना रंगेहात ताब्यात घेतले. रविंद्र राऊत याच्यावर यापूर्वीही गुटख्याच्या तसेच अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणीचे गुन्हे फलटण मधील दोन्ही पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. रविंद्र राऊत याने विविध संघटना व राजकीय पुढारी असल्याचे भासवून यापूर्वी अनेक अधिकार्‍यांना विनाकारण त्रास दिला आहे. सध्या तो एका नामांकित राजकीय पक्षाचा फलटण तालुकाध्यक्ष असून ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये त्याने ही भानगड केल्यामुळे त्याला अभय देणार्‍या फलटणमधील राजकीय पदाधिकार्‍यांना मात्र कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.

याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यातील पो.हवा. चंद्रकांत धापते यांनी फिर्याद दाखल केली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक डी.बी. शिंदे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा महासंघाचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा
पुढील बातमी
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण

संबंधित बातम्या