सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्यातील 242 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होणार्या प्रचार सभांसाठी त्यांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांची भाजपचे सातारा जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकांना उपस्थिती, पक्षशिस्त बाळगून चौकटीत काम करण्याची सवय आणि उत्तम संघटन कौशल्य यामुळे अल्पावधीतच शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीच्या श्रेय नामावलीत सामील झाले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी विचारात घेऊन, भारतीय जनता पक्षाने पालिका निवडणुकांसाठी त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत भाजपची बैठक झाली. त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाला स्टार प्रचारक म्हणून पसंती देण्यात आली. भाजपची घोडदौड राज्यात सुरू ठेवण्याकरिता शिवेंद्रसिंहराजे हे विविध नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राजकीय सभा घेणार आहेत. सातारा जिल्ह्यातही दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील लढत असून, या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे जुळवणे आणि भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर आहे.