घरातील वादाचा थरारक शेवट; मुलीचा जीव घेणाऱ्या शिक्षक वडिलांना न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी, उपअधीक्षक विपुल पाटील यांची माहिती

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : घरातील किरकोळ वादाचे रूपांतर एवढ्या टोकाला गेले की, बॅटच्या प्रहारात अल्पवयीन मुलीचा जीव गेला. गोडोली येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेने सातारा हादरले असून, मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या शिक्षक वडिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पुरुषोत्तम कदम यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यास सांगितल्यावर वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. या वादातून घरातील वातावरण तापले. याचदरम्यान मुलीकडून तिच्या लहान बहिणीलाही मारहाण झाल्याचे आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. जखमी मुलीला घेऊन आई बेडरुममध्ये गेल्यानंतर तिने दरवाजा बंद केला. त्यामुळे त्यानंतर घरात नेमके काय घडले, याची माहिती तिला मिळाली नाही.
पहाटेच्या सुमारास आईला जाग आल्यानंतर मुलगी निपचित अवस्थेत आढळून आली. बॅटने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि संशयित वडिलांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुरुषोत्तम कदम यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, मारहाणीमागील नेमके कारण काय होते, किती वेळ मारहाण झाली, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या दुखापती झाल्या आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. उपअधीक्षक विपुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणातील तपासाची माहिती दिली. पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांचीही पडताळणी केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊस दराचा तिढा सुटेपर्यंत ‘काटा बंद’! अजिंक्यतारा सुरू केल्यास जिल्ह्यातील एकही कारखाना चालू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
पुढील बातमी
आई-वडिलांच्या अपार कष्टाची विद्यार्थ्यांनी जाण ठेवावी - यशेंद्र क्षीरसागर, वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये व्याख्यान

संबंधित बातम्या