पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रोत्सवानिमित्त झालेल्या निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ क्रीडा संस्था कबड्डी संघाने कौलव (कोल्हापूरच्या) शिवमुद्रा कबड्डी संघावर चार गुणांनी मात करत ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस व श्री सेवागिरी चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत २१ निमंत्रित संघांनी सहभाग घेतला.
उपविजेत्या शिवमुद्रा कबड्डी संघाला चषक व ३१ हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. तृतीय क्रमांक विठ्ठल क्रीडा मंडळ ठाणे संघाला २१ हजार व चषक, तर चतुर्थ क्रमांक पटकावलेल्या साईसेवा कबड्डी संघ छत्रपती संभाजीनगरला चषक व ११
हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळाले. या स्पर्धेत बेस्ट रेडर राहुल टेके (छत्रपती संभाजीनगर), बेस्ट डिफेंडर सिद्धेश पांचाळ (ठाणे), मॅन ऑफ द मॅच आदित्य चौगुले (भोसरी), मॅन ऑफ द सिरीज साहिल पाटील (कोल्हापूर) हे खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले. पुसेगाव येथील यात्रा स्थळावर झालेली निमंत्रित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या नियमानुसार झाली. स्पर्धेसाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, श्री सेवागिरी स्पोर्टस् अॅकॅडमीचे आजी-माजी खेळाडू व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभमठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.