सातारा : ‘गोविंदा रे गोपाळा...’च्या जयघोषाने सातारा शहर दुमदुमणार असून, मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवण्याची संधी सातारकरांना पुन्हा मिळणार आहे. श्री छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर यांच्या पुढाकारातून रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता तालिम संघाच्या मैदानावर ‘छत्रपती दहिहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील गोविंदा पथके या उत्सवात सहभागी होणार आहेत. दहिहंडी फोडणाऱ्या विजेत्या पथकाला ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
उत्सवाच्या तयारीला मंगळवारी प्रारंभ झाला. तालिम संघाच्या मैदानावर स्टेज व मंडप उभारणीचा शुभारंभ उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी दहिहंडीच्या माध्यमातून साहस, कौशल्य आणि संघभावनेचे दर्शन घडते, असे सांगितले.
साताऱ्यात पूर्वी मोती चौक, पोवई नाका यांसह विविध ठिकाणी दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळत होता. मुंबई-ठाणे परिसरातील दहिहंडी उत्सवाच्या धर्तीवर गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातही मोठ्या स्वरूपात हा उत्सव साजरा होत आहे. यंदा मुंबई व पुण्याच्या अनुभवी गोविंदा पथकांच्या सहभागामुळे मानवी थरांची उंची आणि थरार वाढण्याची शक्यता आहे.
सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी सुनील काटकर, ॲड. डी. जी. बनकर, अशोक शेडगे, निशांत पाटील, मनोज शेंडे, विजय बडेकर, किशोरतात्या शिंदे यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व उदयनराजे मित्रसमूहाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत प्रितम कळसकर यांनी केले. आभार शिवानीताई कळसकर यांनी मानले.