खंबाटकीच्या बोगद्यातून प्रवास 'सुसाट'; पण महामार्गाच्या निकृष्ट दर्जामुळे अपघातांची भीती ही कायम

by Team Satara Today | published on : 18 January 2026


​सातारा: पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रवास करणाऱ्या सातारकरांसाठी आणि प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून अखेर वाहतूक सुरू झाली आहे. आठ दिवसांच्या यशस्वी चाचणीनंतर जिल्हा प्रशासनाने या नवीन मार्गाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी फुटणार असून, पुण्याला जाताना आता वाहने सुसाट धावणार आहेत. विशेष म्हणजे या बोगद्यासाठी कोणताही वेगळा 'टोल' मोजावा लागणार नाही, ही प्रवाशांसाठी जमेची बाजू आहे.

खंबाटकीचा हा नवीन बोगदा म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना असेलही; तीन लेन, एक्झॉस्ट फॅन्स, आणि सीसीटीव्ही कॅमेरे अशी सर्व सोय तिथे आहे. वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे. पण प्रश्न उरतोच,  पण यापूर्वी सातारा-पुणे महामार्गावर अपघात होवून  सांडलेल्या रक्ताचे काय? असा प्रश्न सुद्धा यानिमित्तानं उपस्थित होत आहे. 

​सातारा-पुणे हा महामार्ग तयार झाल्यापासूनच वादग्रस्त ठरला आहे. हा रस्ता म्हणजे 'प्रगतीचा मार्ग' कमी आणि 'मृत्यूचा सापळा' जास्त ठरला आहे. कंत्राटदारांनी केलेले निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष यामुळे या महामार्गावर आजवर हजारो अपघात झाले आहेत. या 'रक्तरंजित' महामार्गावर शेकडो निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. नवीन बोगदा झाला म्हणून जुन्या जखमा नक्कीच भरून येणाऱ्या नाहीत. नवीन बोगद्यामुळे घाटातील कोंडी सुटेल, पण खंडाळा आणि पुढे पुण्याच्या दिशेने जाताना लागणाऱ्या वाहतूक कोंडीचे काय? बोगद्यातून वेगाने बाहेर पडलेली वाहने पुढे पुन्हा त्याच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावर आणि बॉटलनेक ट्रॅफिकमध्ये अडकणार नाहीत, याची हमी कोण देणार? नवीन बोगद्याचा आनंद साजरा करतानाच, पुढील काळात उद्भवणाऱ्या अडचणी आणि गावांजवळ होणारी कोंडी याचा सामना प्रवाशांना करावा लागणार आहे, हे नाकारून चालणार नाही.

खंबाटकीचा नवीन बोगदा हे नक्कीच स्वागतार्ह पाऊल आहे. पण जोपर्यंत संपूर्ण पुणे-सातारा महामार्गाचा दर्जा सुधारत नाही आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळत नाही, तोपर्यंत हा प्रवास 'रामभरोसे'च राहणार आहे. प्रशासनाने नुसते बोगदे उघडून चालणार नाही, तर महामार्गावरील 'ब्लॅक स्पॉट्स' आणि निकृष्ट कामाची जबाबदारीही जिल्हा प्रशासन तसेच महामार्ग प्राधिकरणाला निश्चित करावी लागेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलांची भांडणे सोडवण्यास गेलेल्या मध्यस्ती महिलेलाच गोडोली येथे मारहाण
पुढील बातमी
घोटाळेबाज महेशकुमार जाधवला तिकीट द्याल तर गाठ ठेवीदारांशी आहे !

संबंधित बातम्या