सातारा : उमेद महिला बचत गटांच्या मिनी सरस मानिनी जत्रेत बचत गट उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या 100 स्टॉल व खाद्यपदार्थांचे 25 स्टॉल सहभागी होणार आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून सातारकरांसाठी 17 ते 21 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद मैदानावर खरेदी, अस्सल गावरान चवीची खाद्य मेजवानी बरोबरच मनोरंजनाची उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत बचत गटांनी मालाचे भव्य विक्री आणि प्रदर्शन मिनी सरस मानिनी जत्रा शुक्रवार दिनांक 17 जानेवारी ते मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 सातारा जिल्हा परिषद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक विश्वास सिद, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे उपस्थित होते.
मानिनी जत्रेबाबत माहिती देताना याशनी नागराजन म्हणाल्या, उमेद बचत गटा अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते. बचत गट उत्पादित माल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून महिलांना उत्पादन विक्रीचे संधी मिळावी यासाठी उमेद अभियान जिल्हा कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. याचाच भाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य कक्षाच्या सूचनेनुसार 17 ते 21 जानेवारी दरम्यान जिल्हा परिषद मैदानावर सकाळी दहा ते रात्री 10 या वेळेत मिनी सरस मानिनी जत्रा आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी दुपारी बारा वाजता जिल्हा परिषद मैदानावर राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन समारंभास पर्यटन मंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री ना.मकरंद जाधव-पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे खासदार नितीन जाधव-पाटील,श्री छ उदयनराजे भोसले, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत तासगावकर, आमदार अरुण लाड, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातून 100 बचत गट उत्पादनाचे आणि 25 गावरान खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंती दिलेला सातारचा Aवन बासुंदी चहा, महाबळेश्वरची जामजेली स्ट्रॉबेरी मध, पाटणची लाकडी खेळणी, जावलीचा हातसडी तांदूळ, मानचे जैन घोंगडी, व्हायची हळद मसाले टेडी, कराडचा नैसर्गिक गुळ पौष्टिक कुळीथ सूप, फलटणचे खणाचे ड्रेस, कोरेगावचे पंचगव्य प्रोडक्स खंडाळाचे कडधान्य लाकडी तेल घाणा तेल आणि खटावची मातीची भांडी हा बचत गट उत्पादित माल या विक्रीस उपलब्ध असणार आहे.
याशिवाय खाद्यपदार्थांचे स्टॉलमध्ये गावरान मटन-चिकन, कोंबडी वडे, दम बिर्याणी, भरलं वांग पिठलं भाकरी, दही धपाटे ठेचा आदी खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत.
त्याचबरोबर या प्रदर्शनास भेट देणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी खास मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बालगोपाळांसाठी आकाश पाळण्यासह विविध प्रकारची खेळणीही या जत्रेत सहभागी असतील. दररोज रात्री सायंकाळी 7 ते 10 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रदर्शन स्टॉल उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून सर्व कामकाज वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.