सातारा : सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पर्जन्यमानामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई आणि शेती उत्पादनावर होणारे संभाव्य प्रतिकूल परिणाम विचारात घेता, रब्बी हंगामात ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. रब्बी ज्वारी हे कमी पाण्यात येणारे महत्त्वाचे तृणधान्य व चारा पीक असल्याने, प्रतिकूल पर्जन्यमानाच्या परिस्थितीत अन्नधान्य व पशुचाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने या पिकाच्या लागवडीला चालना देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन २०२६-२७ मध्ये रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणाचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे मिनीकीट स्वरूपात उपलब्ध करून देऊन रब्बी ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, तसेच अन्नधान्य व पशुचारा उपलब्धतेस हातभार लावणे हा प्रमुख उद्देश आहे.
सातारा जिल्ह्यासाठी प्रति लाभार्थी ४ किलो या प्रमाणे एकूण २५,८१० रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुसार एकूण १,०३२.४० क्विंटल बियाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. सदर मिनीकीट शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या घटकांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीटचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा. प्राप्त उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांना बियाणे मिनीकीटचा लाभ देण्यासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारी पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांनी या विशेष योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा यांनी केले आहे.
रब्बी ज्वारी बियाणे मिनीकीट वितरणासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा