सातारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील 18 गावांची तपासणी सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून करण्यात येत आहे. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यानुसार गुणांकन करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील पुनस, कुरणे, वंदन, मंडणगड तालुक्यातील तोंडली, अडखळ, चिपळूण तालुक्यातील कुशिवडे, कोंडमळा, रत्नागिरी तालुक्यातील वाळके, धामणसे, संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, ओझर्डे खुर्द, दापोली तालुक्यातील आसूद व तलासुरे, खेड तालुक्यातील वरवली व देवघर तसेच राजापूर तालुक्यातील कळसावली व खरवटे या गावांची तपासणी करण्यात येणार आहे. समितीचे जिल्ह्यात आगमन झाले असून निवडक गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली आहे.
ही समिती सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून उभारण्यात आलेली लोकचळवळ तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करणार आहे. प्रमुख आठ निकषांनुसार गावांचे मूल्यमापन करून त्यानुसार गुणांकन केले जाणार आहे.
तालुकास्तरावरील उत्कृष्ट प्रथम दोन ग्रामपंचायतींचे जिल्हास्तरीय समितीकडून मूल्यमापन करण्यात येणार असून त्यातून सर्वाधिक गुण प्राप्त तीन ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून निवड केली जाईल. त्यानंतर विभागस्तरीय व राज्यस्तरीय समितीकडूनही अशाच पद्धतीने मूल्यमापन होऊन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावांचे मूल्यमापन करण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तपासणी समिती कार्यरत आहे. या समितीत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक अंकुश मोटे, पत्रकार प्रवीण शिंगटे, पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ अजय राऊत, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, जयवंत ढाणे, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कळस्कर तसेच प्रसाद सावंत यांचा समावेश आहे.
दरम्यान, समितीचे स्वागत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील तसेच ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बालाजी पोशेट्टी यांनी केले.