समर्थ मंदिर परिसरात अतिक्रमणांवर पालिकेचा बुलडोझर; वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाई; आत्मदहनाच्या प्रयत्नाने तणाव

by Team Satara Today | published on : 25 May 2026


सातारा : समर्थ मंदिर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीला जबाबदार ठरत असलेल्या अतिक्रमणांवर अखेर सातारा पालिकेने सोमवारी बुलडोझर फिरवत मोठी कारवाई सुरू केली. पहाटेपासूनच पालिकेचे पथक, पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्री परिसरात दाखल झाल्याने समर्थ मंदिर परिसर रणांगणात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पालिकेने यापूर्वी अनेक वेळा नोटिसा बजावूनही संबंधित मिळकतधारकांनी अतिक्रमणे हटवण्यास टाळाटाळ केल्याने प्रशासनाने अखेर थेट कारवाईचा मार्ग स्वीकारला. आम्ही स्वतः काढून घेतो अशी विनंती करत काहींनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी पालिकेने कोणतीही माघार न घेता नियोजित मोहिमेला सुरुवात केली.

रुंदीकरण मोहिमेसाठी अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, शहर विकास विभाग, आरोग्य विभाग आणि विद्युत विभागाची संयुक्त फौज मैदानात उतरली होती. शहर पोलीस, शाहूपुरी पोलीस आणि वाहतूक शाखेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

कारवाईदरम्यान इक्बाल बागवान यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरातील वातावरण अधिकच तापले होते.

पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे समर्थ मंदिर ते बोगदा मार्गावरील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. दुपारपर्यंत बुलडोझरची मोहीम वेगात सुरू होती. सुमारे 30 मिळकतधारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचे स्वागत केले असून उशिरा का होईना, पण प्रशासन जागे झाले अशा प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेकडून रत्नागिरीतील 18 गावांची तपासणी; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची माहिती
पुढील बातमी
रक्षक प्रतिष्ठानचा पदाधिकारी मेळावा जलमंदिर पॅलेस येथे उत्साहात; खा. उदयनराजे यांची उपस्थिती; नव्या प्रेरणादायी गाण्याचे अनावरण

संबंधित बातम्या