जलसंधारण अभियानात विविध उपक्रम राबवावेत : डॉ. प्रिया शिंदे

by Team Satara Today | published on : 19 August 2026


सातारा : मृद व जलसंधारण हे शेती, पर्यावरण आणि शाश्‍वत विकासाचा पाया आहे. माती व पाण्याचे संरक्षण तसेच भावी पिढीमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या जलसंधारण अभियानात युवा पिढीचा सहभाग वाढवून क्षेत्रीय स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.

बुधवारी पत्रकार परिषदेत डॉ. प्रिया शिंदे यांनी जलसंधारण सप्ताह व अभियानाची माहिती दिली. जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्टदरम्यान ’जलसंधारण सप्ताह’, तर 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत व्यापक ’जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निबंध, चित्रकला-पोस्टर, वादविवाद आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच ’एक शाळा, एक शोषखड्डा’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 21) जलसंधारण दिनानिमित्त शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार असून, महाराष्टत्र्वाचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

जलसंधारण अभियान केवळ शैक्षणिक उपक्रमांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांवरही भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांचे भूमिपूजन, लोकार्पण व जलपूजन करण्यात येणार आहे. ’एक पेड मॉं के नाम’ अभियानांतर्गत व्यापक वृक्षारोपण, नाला व तलाव स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय शेततळे, पाझर तलाव आणि बंधार्‍यांची पाहणी करून त्यांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या कामालाही गती देण्यात येणार आहे.

शाश्‍वत विकासासाठी मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ते यशस्वी करावे, असे आवाहन डॉ. प्रिया शिंदे व याशनी नागराजन यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भोंदूगिरी व अंधश्रद्धाजन्य गुन्ह्यांविरुद्ध विशेष कृती आराखडा राबवा; शिवसेना नेत्या, आमदारनीलम गोऱ्हे यांची मागणी, पोलीस महासंचालकांना सात कलमी निवेदन
पुढील बातमी
सातारा पालिकेच्या 13 कर्मचार्‍यांना सफाई कामगारपदी नियुक्ती

संबंधित बातम्या